(छत्रपती संभाजीनगर)
राज्याला हादरवून सोडणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर त्याच क्षेत्रातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. आरोपीने पीडितेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचेही उघड झाले आहे.
नेमके काय घडले?
पीडित तरुणी आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही मूळचे परभणी जिल्ह्यातील. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे राहत होते. एकाच जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि ती पुढे प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. पीडितेच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपीने तिला अजबनगर परिसरातील ‘एमएच-20’ कॅफेत नेले. तिथे शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
या अत्याचारानंतर पीडिता गर्भवती झाली. गर्भधारणा समजताच आरोपीने तिला खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गर्भपात झाल्यानंतर त्याने पीडितेशी सर्व संपर्क तोडला—फोन, सोशल मीडिया सर्वत्र तिला ब्लॉक केले. याच काळात आरोपी भागवत मुलगीर हा PSI पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजते.
पीडितेने न्याय मिळावा म्हणून आरोपीच्या वडील आणि बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहानुभूती देण्याऐवजी आरोपीच्या कुटुंबीयांनी तिला “तुला जे करायचं ते कर” अशी धमकी दिल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आला. मानसिक छळ, धमक्या आणि अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
PSI आणि कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रशिक्षणार्थी PSI भागवत ज्ञानोबा मुलगीर याच्याविरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच धमकावण्याप्रकरणी त्याचे वडील व बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कॅफेच्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, आरोपी PSI आणि त्याचे कुटुंबीय सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे.

