(मुंबई)
मविआ आणि महायुती या दोन्ही ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा युतीतील वेगवेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटची मुदत होती. मंगळवारी राज्यभरात अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची गडबड सुरू होती, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एका मतदारसंघात अनेक नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. काही नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली आहे, तर महायुतीमधील काही नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीआधच महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढले आहे.
भाजपलाही बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात पूर्ण यश आलेले नाही. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येने लढत आहेत. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षातील अंतर्गत बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने कोण कोण अर्ज भरणार, याकडे लक्ष लागले होते. जवळपास सर्वच ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने आता किती बंडोपंत माघार घेणार, याकडे लक्ष लागले आहे. शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर
मुंबईसह राज्यात शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षातील इच्छुक आजी – माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी बंडखोरीची तलवार उपसली आहे. त्यामुळे २८८ पैकी बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यासोबतच काही ठिकाणी अधिकृत आणि मित्रपक्षाचाही उमेदवार मैदानात उतरल्याने महायुती, आघाडीतही अधिकृत उमेदवारांची अडचण झाली आहे. दरम्यान, १९९५ नंतर प्रथमच यावेळी सर्वाधिक २४५ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उदंड झाले बंडोबा असे म्हणण्याची वेळ आली असून, महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडोबाचे आव्हान असणार आहे. या सर्व बंडोबांना शांत करण्याची कसरत त्या त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना करावे लागणार आहे.
कोठे झाली बंडखोरी
शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर
- पाचोऱ्यात शिंदे गटाचे किशोर पाटील महायुतीचे उमेदवार आहेत. तिथं भाजपच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केलीय
- बुलढाण्यात शिंदेंचे संजय गायकवाड अधिकृत उमेदवार आहेत. इथं भाजपच्या विजयराज शिंदेंची बंडखोरी केली आहे.
- मेहकरमधुन रायमुलकरांना शिंदेंचं तिकीट, भाजपच्या प्रकाश गवईंचं बंड
- ओवळा माजीवाड्यातून शिंदेंच्या प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचे उपमहापौर राहिलेल्या हसमुख गेहलोतांचं बंड
- पैठणमध्ये शिंदेंच्या विलास भुमरेंविरोधात भाजपच्या सुनिल शिंदेंची बंडखोरी
- जालन्यात शिंदेंच्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपचे भास्कर दानवेंची बंडखोरी
- सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपच्या सुनिल मिरकरांची बंडखोरी
- सावंतवाडी शिंदेंच्या दिपक केसरकरांविरोधात भाजपच्या विशाल परबांचं बंड
- घनसावंगीत शिंदे गटाच्या हिमकत उढाणांविरोधात भाजपचे सतिश घाटगेंची बंडखोरी
- कर्जतमधुन शिंदेंच्या महेंद्र थोरवेंविरोधात भाजपच्या किरण ठाकरेंची बंडखोरी
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात भाजप उमेदवारांची बंडखोरी
- अहेरीत दादा गटाच्या धर्मराव अत्रामांविरोधात भाजपचे अंबरिश अत्रामांची बंडखोरी
- अमळनेरात दादा गटाच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरिश चौधरींची बंडखोरी
- अमरावतीत सुलभा खोडके विरोधात भाजपचे जगदिश गुप्तांकडून बंडखोरी
- वसमतमध्ये राजू नवघरेंविरोधात भाजपचे मिलिंद एंबलांची बंडखोरी
- पाथरीत राजेश विटेकरांविरोधात भाजपचे रंगनाथ सोळंकेची बंडखोरी
- शाहपूरमधुन दौलत दरोडांविरोधात रंजना उगाडाची बंडखोरी
- जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात भाजपच्या आशा बुचकेंची बंडखोरी
- मावळात सुनिल शेळकेंविरोधात भाजपच्या भेगडे बंधूंची बंडखोरी
- उदगीरमध्ये संजय बोनसोडेंविरोधात भाजपच्या दिलीप गायकवाडांची बंडखोरी
- कळवणमध्ये नितिन पवारांविरोधात रमेश थोरातांची बंडखोरी
भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची बंडखोरी
- ऐरोलीत भाजपच्या गणेश नाईकांविरोधात शिंदे गटाच्या विजय चौघुलेंचं बंड
- बेलापूरात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात विजय नहाटांची बंडखोरी
- कल्याण पुर्वमधुन भाजपच्या सुलभा गायकवाडांविरोधात महेश गायकवाडांची बंडखोरी
- विक्रमगडमधुन भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंविरोधात प्रकाश निकमांची बंडखोरी
- फुलंब्रीत भाजपच्या अनुराधा गायकवा़डांविरोधात रमेश पवारांची बंडखोरी
- सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठेंविरोधात मनीष काळजेंची बंडखोरी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची बंडखोरी
- पाथरीत राजेश विटेकरांविरोधात शिंदे गटाच्या सईद खानांची बंडखोरी
- आळंदीतून दिलीप मोहितेंविरोधात अक्षय जाधवांचं बंड
- जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात माजी आमदार शरद सोनवणेंचं बंड
- येवल्यात छगन भुजबळांविरोधात सुहास कांदेंच्या पत्नीचं बंड
- वाईमधुन मकरंद पाटलांविरोधात पुरूषोत्तम जाधवांची बंडखोरी
- अनुशक्तीनगर मधुन सना मलिकांविरोधात अविनाश राणेंची बंडखोरी
- देवळालीत सरोज अहिरेंविरोधात राजश्री अहिररावांचं बंड
- दिंडोरीत नरहरी झिरवाळांविरोधात धनराज महालेंना बंडखोरी
- बीडमध्ये योगेश क्षिरसागरांविरोधात अनिल जगतापांची बंडखोरी
मविआतल्या तीनही पक्षात कुठे-कुठे बंडखोरी?
- कसब्यात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांविरोधात काँग्रेसच्याच कमल व्यवहारेंची बंडखोरी
- पारोळा-एरंडोल मतदारसंघात शरद पवार गटाच्या सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्या हर्षल मानेंची बंडखोरी
- पारोळ्यात सतिष पाटलांविरोधात ठाकरे गटाच्याच नानाभाऊ महाजन यांचीही बंडखोरी
- परळीत शरद पवार गटाचे उमेदवारी राजेसाहेब देशमुखांविरोधात पवार गटाचेच राजभाऊ फड यांचं बंड
- बीडमध्ये शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांविरोधात पवार गटाच्याच ज्योती मेटेंची बंडखोरी
- भायखळ्यात ठाकरे गटाच्या मनोज जामसुतकरांविरोधात काँग्रेसच्या मधु चव्हाणांची बंडखोरी
- राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या राजन साळवींविरोधात काँग्रेसच्या अविनाश लाडांची बंडखोरी
- जिंतूरमध्ये शरद पवार गटाच्या विजय भांबळेंविरोधात काँग्रेसच्या सुरेश नागरेंची बंडखोर
- रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या बाळ माने यांच्या विरोधात ठाकरे गटाच्याच उदय बनेंची बंडखोरी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल
- श्रीगोंद्यात ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडेंविरोधात शरद पवार गटाच्या राहुल जगतापांची बंडखोरी
- सांगोल्यात ठाकरे गटानं दीपक साळुंखेंना तिकीट दिल्यानंतर मविआतील शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी बंडखोरी केलीय
- दक्षिण सोलापुरात शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटलांना तिकीट दिलंय. इथं काँग्रेसच्या दिलीप मानेंनी बंड केलंय
- पंढरपुरात आधी काँग्रेसनं भगीरथ भालकेंना तिकीट दिलं., त्यानंतर शरद पवार गटाच्या यादीत पंढरपुरातच अनिल सावंतांचं नाव जाहीर झालंय
- परांड्यात ठाकरे गटानं रणजीत पाटलांना तिकीट दिलंय.. इथंच शरद पवार गटानं राहुल मोटेंनाही उमेदवारी जाहीर केलीय
- कुर्ल्यात ठाकरे गटानं प्रविणा मोरजकरांना तिकीट दिलंय. पण शरद पवार गटाकडून मिलिंद कांबळेंनाही उमेदवारी जाहीर झालीय.