(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र तसेच देवरूख पंचायत समिती कार्यालयातील लिपिक अरविंद भागुराम पवार (वय ४९) यांचे काल (शनिवारी) दुपारी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.
अरविंद पवार हे अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या सेवाकार्याची सुरुवात देवरूख येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात झाली होती. त्यानंतर त्यांची पंचायत समिती कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात लिपिक म्हणून बदली झाली असून ते सध्या तेथे कार्यरत होते.
शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता हातीव येथील देवराई परिसरात त्यांनी अलीकडेच विकत घेतलेली जमीन पाहण्यासाठी ते गेले होते. मात्र दुपार झाली तरी ते जेवणासाठी घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. पत्नीने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागत नसल्याने त्या स्वतः हातीव देवराई येथे गेल्या. तेथे अरविंद पवार निपचित अवस्थेत आढळून आले.
तातडीने त्यांना देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देवरूख परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
त्यांच्या अकाली निधनाने एक सुस्वभावी, कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, एक बहीण, पुतणे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) सकाळी १०.३० वाजता मारळ या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

