(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रिपलसीट दुचाकीवर बसलेले अन्य दोघे तरुण गंभीर जखमी झाले. भरधाव दुचाकीने रिक्षा-टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली.
हा अपघात शनिवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास खेडशी–महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील राधाकृष्ण ग्रॅनाइटसमोर झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवळी येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा-टेम्पो (एमएच ०८ बीसी १२७९) खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने (एमएच ०८ एडब्ल्यू १६६२) जोरदार धडक दिली. दुचाकीवर तिघे तरुण ट्रिपल सीट प्रवास करत होते.
धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव, रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर आर्यन विनोद कुरतडकर (१९) आणि पार्थ विजय कुरतडकर (१९, दोघेही रा. कापडगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. तरुणाच्या अकाली मृत्यूने कापडगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी–हातखंबा मार्गावर अपघातांची मालिका
रत्नागिरी ते खेडशी या चौपदरीकरण होत असलेल्या मार्गावर विशेषतः रात्रीच्या सुमारास अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेगावर नियंत्रण नसणे, ट्रिपल सीटसारखे नियमभंग आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा यामुळे हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. खेडशी येथील ताज्या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक शिस्तीच्या अभावाचे गंभीर परिणाम समोर आले असून अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

