(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस मधील नवजीवन विद्यालय या माध्यमिक शाळेत गेली १८ वर्षे मराठी विषय शिकवणारे शिक्षक मंदार भागवत सर हे विद्यार्थ्यांमध्ये वाचनप्रेम वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवत खाऊच्या ऐवजी त्यावर खर्च होणाऱ्या पैशातून ‘किशोर’ मासिक घेण्याचे सूचविले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या सूचनेला आदरपूर्वक मान देत खाऊचे पैसे साठवून मासिकाची वार्षिक वर्गणी भरली.
खाऊच्या पैशातून ‘किशोर चळवळ’ राबविण्याचा उपक्रम शासनाच्या महावाचन अभियानास पूरक ठरला आहे, यापूर्वी भागवत सरांनी वाढदिवसानिमित्त ‘चॉकलेट्स’ वाटण्याऐवजी ‘शाळेस पुस्तक भेट’ उपक्रम राबविला. त्यामुळे यापूर्वी पुराचे पाणी येऊन त्यात नष्ट झालेल्या शालेय ग्रंथालयास पूर्वरूप प्राप्त झाले. आज त्यामुळे शाळेचे ग्रंथालय पुस्तकांनी सुसज्ज असे झाले आहे.
वाचनापासून दूर जाणाऱ्या नव्या पिढीला वाचनाकडे आणणारे हे कार्य खूपच स्तुत्य व कौतुकास्पद आहे. या वाचनवाढीच्या शालेय उपक्रमांस ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.