(संगमेश्वर)
बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर अनुपस्थित राहिल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना खोळंबा सहन करावा लागला. शनिवारी सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत बाह्यरुग्ण तपासणी सेवा देण्याची वेळ असूनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.
या आरोग्य केंद्रावर बुरंबीसह आजूबाजूच्या आठ ते दहा गावांतील नागरिक उपचारासाठी येतात. ग्रामीण भागातील लोक वाहनांच्या मर्यादित सुविधांमुळे निश्चित वेळेतच प्रवास करतात. मात्र डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे साधारण वीस ते पंचवीस रुग्ण केंद्रात ताटकळत उभे असल्याचे पाहायला मिळाले.
या बाबत रुग्णांशी संवाद साधला असता, त्यांनी नाराजी व्यक्त केली. “जर डॉक्टर वेळेवर येत नसतील, तर वेळेचा फलक लावून काय उपयोग?” असा सवाल रुग्णांनी उपस्थित केला. यावेळी काही रुग्णांनी शेतीकामांमुळे वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेल्या शेतीकामांमध्ये खंड न पडता आरोग्यसेवा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहावेत व रुग्णसेवा सुरळीत व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकाराबाबत स्थानिक आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असून, नियमित वेळेचे पालन व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.