(नागपूर)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केली.
नागपुरात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महायुतीतील समन्वय, जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. शिंदे यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावरील समित्या पुढील चर्चा करतील. जिथे कुठे मतभेद किंवा अडचणी येतील, तिथे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून त्या सोडवतील. महायुतीतील कोणत्याही घटकाला बाजूला ठेवण्याचा प्रश्न नाही, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत.
गेल्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत अंतर्गत तणाव असल्याचे चित्र दिसत होते. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद, आरोप तसेच हाणामारीच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे महायुतीतील पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र शिंदे–चव्हाण बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचा मुद्दा अधोरेखित केला. “मी मुख्यमंत्री असतानाचे अडीच वर्ष आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एक वर्ष अशा साडेतीन वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत. हाच आमचा अजेंडा असून, कामाच्या जोरावरच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत,” असे शिंदे म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत स्थानिक तसेच वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, एकत्रित रणनीती आखून निवडणूक लढवण्यावर आता स्पष्टता आली आहे.

