(संगमेश्वर / एजाज पटेल)
दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहाच्या जल्लोषात पार पडलेल्या साखरपा बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत कनकाडी जि. प. शाळा गुरववाडीने अतिशय भव्य, दमदार असे यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारांत मिळालेल्या उत्तुंग कामगिरीमुळे शाळेने बीटस्तरावर आपला ठसा उमटवला.
क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या मोठ्या संख्येतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्कृष्ट तयारी आणि जिद्दीच्या जोरावर खालील गुणदर्शन केले
उंचउडी स्पर्धा – मुली (मोठा गट)
कु. पूर्वी विजय गोपाळ – प्रथम क्रमांक,उंचउडीतील तिचा नेमका अंदाज, भरभरून आत्मविश्वास आणि तांत्रिक परिपक्वता पाहून प्रेक्षकांनी दाद दिली.
उंचउडी स्पर्धा – मुली (लहान गट)
कु. तन्वी प्राजक्ता मेस्त्री – प्रथम क्रमांक
लहान गटातील तन्वीने वयाच्या मानाने विलक्षण कौशल्य दाखवत निर्णायक उडीमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
लंगडी स्पर्धेत गुखवाडी शाळेचा दबदबा
बीटस्तरीय लंगडी स्पर्धेत गुरववाडी शाळेच्या संघाने उत्कृष्ट संघभावना, चपळाई आणि रणनीतीचे प्रदर्शन केले. संघाचे प्रभावी प्रतिनिधित्व कु. स्वरा विलास सुकम, कु. शुभ्रा प्रकाश सुकम, कु. कार्तिकी प्रदीप गोपाळ या विध्यार्थिनी केले.या संघाने अतिशय शिस्तबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघांची दाद मिळवली. संपूर्ण खेळभर गुरववाडीच्या मुलींचा जोश व खेळातील पकड खरोखरच लक्षणीय होती.
स्पर्धा संपल्यानंतर गुरववाडी शाळेत कौतुकाचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट आणि अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
विद्यार्थ्यांची संख्या मोठी असूनही सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आणि अभिमान दिसत होता. ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन या यशाचा आनंद साजरा केला.
या उज्ज्वल कामगिरीमागे गुरववाडी शाळेच्या शिक्षकांचे अथक परिश्रम आणि नियोजन महत्त्वाचे ठरले. मुख्याध्यापक श्री. रुपेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत क्रीडा संस्कृतीची जाण विद्यार्थ्यांत रूजवली. तर सौ. प्रतिभा गारे, श्री. मुकुंद वाजे, श्री. दीपक करंडे या शिक्षकांनी क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना कसून मार्गदर्शन केले. नियमित सराव, प्रात्यक्षिके, शारीरिक तंदुरुस्तीचे धडे आणि स्पर्धेपूर्वीचा विशेष सराव यांनी विद्यार्थ्यांची तयारी अधिक चांगली बनली. विस्तार अधिकारी श्री. तानाजी नाईक यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील उच्चस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
कनकाडी आणि गुरववाडी परिसरात विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. मुलांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले

