(मुंबई)
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व तत्सम पदे (गट–ब) या संवर्गातील भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील ‘कुणबी’ उमेदवारांना इतर मागास वर्ग (OBC) म्हणून दावा करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयोगाने शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. याअंतर्गत एकूण ६५ पदांची भरती करण्यात येणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ जून २०२५ पासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२५ आहे.
कुणबी प्रमाणपत्र धारकांना OBC चा पर्याय
२८ मे २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ‘कुणबी’ म्हणून ओळख मिळालेल्या आणि OBC जातीचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत OBC प्रवर्गाचा दावा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे, ‘EWS’ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या आणि OBC प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना आता OBC प्रवर्गाचा दावा सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
विकल्प कसा सादर करावा?
-
संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘My Account’ या प्रोफाइल विभागात, संबंधित जाहिरातील “Question” या बटनावर क्लिक करून विचारलेली माहिती भरून OBC किंवा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा सादर करावा.
-
एकदा OBC किंवा मागासवर्गाचा दावा सादर केल्यास, मूळ अर्जामधील EWS दावा रद्द झालेला मानला जाईल.
-
तसेच, OBC किंवा SEBC प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत EWS चा लाभ मिळणार नाही, याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
नवीन अर्जदारांसाठी सूचना
जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी नव्याने अर्ज करत आहेत, त्यांनी वर सांगितलेल्या प्रक्रियेनुसार ऑनलाइन अर्ज भरताना योग्य पर्याय निवडावा. कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अधिकृत व सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात उपलब्ध आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.