(नवी दिल्ली)
सायबर सुरक्षा क्षेत्रातील नामांकित रिसर्च फर्म ‘अपगार्ड’ने धक्कादायक दावा केला आहे. भारतातील तब्बल ३८ हून अधिक बँका आणि वित्तीय संस्थांचे लाखो गोपनीय व्यवहार रेकॉर्ड इंटरनेटवर उघड झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार एका असुरक्षित क्लाउड सर्व्हरमुळे लीक झाल्याचे सांगितले जात आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक, व्यवहाराची रक्कम, संपर्क तपशील यांसारखी अत्यंत संवेदनशील माहिती समाविष्ट आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
२.७३ लाख फाईल्स उघड
‘अपगार्ड’च्या अहवालानुसार, ऑगस्ट अखेरीस अमेझॉन एस३ क्लाउड स्टोरेज सर्व्हरवरून सुमारे २.७३ लाख पीडीएफ फाईल्स लीक झाल्या. या फाईल्स नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) प्रणालीशी संबंधित होत्या. NACH चा वापर बँका मोठ्या प्रमाणावर पगार ट्रान्सफर, कर्जाचे हप्ते, वीज-पाण्याची बिले भरण्यासारख्या व्यवहारांसाठी करतात. त्यामुळे हॅकर्सपर्यंत ही माहिती पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जबाबदारी कोणाची?
या डेटा लीकमध्ये ‘ओय फायनान्स’ या कंपनीचे नाव समोर आले आहे. ‘अपगार्ड’ने सांगितले की, ही बाब एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि संबंधित कंपनीला कळवण्यात आली होती. तरीही सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत हा डेटा इंटरनेटवर खुलाच होता. त्यात रोज नव्या फाईल्सची भरदेखील पडत होती.
अखेर सर्व्हर सुरक्षित
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अखेरीस सीईआरटी-इन (भारतीय संगणक आणीबाणी प्रतिसाद पथक)ला सूचित करण्यात आले. त्यानंतरच हा सर्व्हर सुरक्षित करण्यात आल्याचे ‘अपगार्ड’ने स्पष्ट केले आहे.

