(लातूर)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर (वय ९०) यांचे आज (शुक्रवारी) सकाळी लातूर येथे निधन झाले. लातूरमधील ‘देवघर’ या त्यांच्या निवासस्थानी सकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
शिवराज पाटील-चाकूरकर हे भारतीय राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात. त्यांनी संसदीय व प्रशासकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ योगदान दिले. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विजय मिळवत लोकसभेत भक्कम नेतृत्व निर्माण केले.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
१९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात लोकसभेचे संगणकीकरण, थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय भवन अशा अनेक आधुनिक पावलांना गती मिळाली. देशातील ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेल्या पाटील-चाकूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९६७–६९ या काळात लातूर नगरपालिकेतून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
२००४ मध्ये लोकसभा निवडणूक हरूनही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद दिले. मात्र २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेस पक्षासह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करून भारतीय राजकारणातील एक मजबूत स्तंभ हरवल्याची भावना व्यक्त केली आहे.

