(चिपळूण)
तालुक्यातील तळसर केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत पिंपळी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सांघिक विभागात उल्लेखनीय कामगिरी करत अनेक चषकांवर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत तळसर केंद्रातील आठ शाळांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण स्पर्धा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीचे उत्तम दर्शन घडवत विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये सआद बोदले, साजिद लोणे, शिफा मिराखान, तस्लिमा देवळेकर, रईस लांजेकर आणि हिना बावडेकर यांनी चमकदार यश प्राप्त केले.
तर सांघिक कबड्डी आणि खो-खो स्पर्धांमध्ये लहान व मोठ्या गटातील मुलगे आणि मुलींनी विशेष कामगिरी करून विजेतेपद पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षक शराफत फकीर, आस्मा मोमीन, समीना खान आणि नसिरुद्दीन शाह यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
स्पर्धेत यशप्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य पिंपळी बुद्रुकच्या शिक्षणप्रेमी सरपंच स्मिता राजवीर तसेच तळसर केंद्राच्या केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. पिंपळी उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीनेही आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

