(खेड)
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डायटचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
या स्पर्धातंर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुकास्तरावर स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन खेड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत माणी नं.१ या शाळेतील पदवीधर शिक्षिका श्री. दिप्ती दिलीप यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी या स्पर्धेमध्ये समानतेची पेरणी हे स्वरचित काव्य सादर केले. त्यांचे हे काव्य परीक्षकांच्या पसंतीस उतरले व दिप्ती यादव यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
लहानपणापासूनच काव्य लेखनाची कला जोपासणाऱ्या दीप्ती यादव यांची विभागस्तरावर निवड झालेली आहे. दिप्ती यादव यांना या अगोदर काव्यलेखन स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

