(खेड)
तालुक्यातील कुरवळ गावठाण येथे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत तब्बल २ लाख ३० हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हरिश्चंद्र बापू उतेकर (वय ५०, व्यवसाय-शेती, रा. कुरवळ गावठाण, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत त्यांच्या घरात कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पोटमाळ्यावर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीतून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये १८ ग्रॅम ९४० मिली वजनाचा पिवळ्या धातूचा हार (₹१,१९,३७२ किंमत), दोन मंगळसूत्रे (₹९४,१२६ किंमत) त्यापैकी एका मंगळसूत्रात ३ ग्रॅम ४०० मिली वजनाची पिवळ्या धातूची वाटी आणि दुसऱ्या मंगळसूत्राचे वजन १३ ग्रॅम ९४० मिली आहे. तसेच १ ग्रॅम ३० मिली वजनाची बाळी (₹८,६३२ किंमत) आणि ११५ ग्रॅम वजनाची सफेद धातूची साखळी (₹८,००० किंमत) असा एकूण ₹२,३०,१३० किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.