(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील तोणदे मेन रोड ते प्रकाश पांडुरंग मयेकर यांच्या घराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम अद्याप रुग्णवाहिका तसेच चारचाकी वाहन ये-जा करू शकेल इतकेही पूर्ण करण्यात आलेले नसताना संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा रनिंग मूल्यांकन दाखला देऊ नये, अशी ठाम मागणी प्रणिता विलास मयेकर यांनी केली आहे.
तोंणदे मेन रोड ते प्रकाश पांडुरंग मयेकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खोदकामानंतर अर्धवट अवस्थेत पडून आहे. परिणामी, वाडीतील महिला रुग्णासह संपूर्ण मयेकर कुटुंबाला अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्ता असूनही वापरता न येणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची ज्वलंत साक्ष असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून संबंधित रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असताना अचानक तोच मार्ग दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मयेकर यांनी केला आहे. रस्ता कुठूनही जरी तयार करण्यात यावा परंतु प्रकाश पांडुरंग मयेकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.
या रस्त्याचे काम मयेकर यांच्या घरापर्यंत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारास देयके अदा करू नये जर देयके अदा केली तर अन्यायाला थेट पाठबळ देण्यासारखे चित्र उभे राहून अशा परिस्थितीत संबंधित अभियंते हेही या अन्यायात सहभागी असल्याचे स्पष्ट होईल. या अपूर्ण रस्त्यामुळे कै. रविंद्र पांडुरंग मयेकर यांच्या कुटुंबावर अन्याय होत असून, दैनंदिन गरजेच्या प्रसंगी अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे चित्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जर या संदर्भात तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात आली नाही आणि रस्त्याचे काम पूर्ण क्षमतेने करण्यात आले नाही, तर नागरिकांकडून कायदेशीर मार्गाने ठोस पावले उचलण्यात येतील. त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या सर्व परिणामांस जबाबदार संबंधित विभाग व अधिकारीच असतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

