(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घसरली आहे. उपलब्धतेत झालेल्या घटेमुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत, बुधवार (६ मे) पासून ‘एक दिवस आड’ पाणी देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या निर्णयानुसार गुरुवार, ७ मे रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत शांतीनगर परिसरातील एकता वसाहत व बाजार समिती, रसाळवाडी (रणसे ते मगदूम), स्वानंद कॉलनी, पद्मावती पार्क, समर्थनगर, गुरुमळी, वरची व खालची सुपलवाडी, सुपलवाडी स्टॉप परिसर तसेच पांडवनगर (विलास सावंत यांच्या घरांपर्यंत) या भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान, पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊ नये यासाठी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, तसेच ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

