(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मावस भावाच्या वादाबाबत मित्रासोबत ग्रामीण पोलिस स्थानकात जात असताना वाटेत थांबवून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी रत्नागिरी शहरानजीकच्या टीआरपी येथे घडली.
गौरेश पाटील, हर्षा पाटील, शुभम पाटील, आदि पाटील, क्रिश पाटील, साई पाटील व अन्य चार (सर्व रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भूषण बिपीन सावंत (२४, रा. मिऱ्या बंदर, रत्नागिरी) याने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. भूषण सावंत हा गुरुवारी दुपारी त्याचा मावस भाऊ धर्मलिंग नाडर याच्या झालेल्या भांडणाबाबत मित्र सर्वेश कीर याच्यासोबत दुचाकीने ग्रामीण पोलिस स्थानकात जात होता. त्यावेळी टीआरपी येथे दोन तरुणांनी दुचाकीवरून येत या दोघांना थांबवले. त्यानंतर दोघांनी मावस भाऊ धर्मलिंग नाडर याच्याशी झालेल्या भांडणावरून त्याला इकडे बोलावून घे, असे सांगितले. दरम्यान, अन्य सात ते आठ संशयितही त्याठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी भूषण आणि त्याचा मित्र सर्वेशसोबत वादविवाद सुरू केला.
त्यानंतर गौरेश पाटील याने भूषणच्या अंगावर धावत जाऊन फाईट मारली तर शुभम पाटील याने रॉड भूषणच्या डोक्यावर, मानेवर मारला. तसेच हर्षा पाटील, क्रिश पाटील, आदि पाटील व इतर दोघांनी भूषण आणि त्याचा मित्र सर्वेश याला मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. या झटापटीत भूषणच्या गळ्यातील चेन आणि ब्रेसलेट गहाळ झाले आहे. पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा धाक नाही का?
हा संपूर्ण प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पाहिला, तसेच असे प्रकार घडत असल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मात्र, पोलीस यंत्रणा, नेटवर्किंग आणि पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रात्रीच्या सुमारास टोळ्क्याने येऊन अशा मारहाणीच्या घटना घडत असतील तर अशा टोळक्याना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शांत संयमी रत्नागिरीची ओळख असणाऱ्या शहरात पोलीसांचा कसलाही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

