(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील टिके येथे रेल्वे ठेकेदाराची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात रत्नागिरी न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. जनरेटर भाड्याने घेऊन वापर करूनही भाडे न भरल्याने ही फसवणूक झाल्याची तक्रार ठेकेदाराकडून करण्यात आली होती.
जय कदम आणि कुणाल जय कदम (दोघे रा. भातगाव, ता. गुहागर) अशी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. श्रीनिवासराव गोपालकृष्णय्या गोगीनेनी (वय ५७, रा. मिरजोळे) या रेल्वे ठेकेदाराने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ते ‘आदित्या कन्स्ट्रक्शन’ या कंपनीमार्फत एल. अँड टी कंपनीच्या रेल्वे प्रकल्पांवर काम करतात.
११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी त्यांनी टिके येथे एल. अँड टीच्या मालकीचा व त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीचा, ७.५ केव्ही क्षमतेचा लाल रंगाचा जनरेटर जय कदम याला भाड्याने दिला होता. एक महिन्याचे १५ हजार रुपये दराने ४० महिन्यांचे एकूण सहा लाख रुपये भाडे ठरवले होते. मात्र, संशयितांनी हा जनरेटर स्वतःच्या वापरासाठी घेतल्याने ना तो परत केला, ना भाडे भरले. त्यामुळे ठेकेदाराची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
या प्रकारामुळे ठेकेदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी जय कदम आणि कुणाल जय कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (गुन्हेगारी विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस तपास सुरू असून, न्यायालयीन सुनावणीसाठी पुढील तारखेची प्रतीक्षा आहे. दरम्यान, फसवणुकीच्या अशा घटनांमुळे व्यावसायिक वर्तुळात सावधगिरी बाळगण्याचे संकेत मिळत आहेत.