(मुंबई)
राज्य शासनाने 2026 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना जारी केली असून, येत्या वर्षी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. विशेष म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी भाऊबीजच्या दिवशी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आल्याने कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिद्ध करताना सांगितले की, जाहीर सुट्ट्यांमध्ये प्रमुख राष्ट्रीय उत्सवांपासून धार्मिक सणांपर्यंत सर्व महत्वाचे दिवसांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शासन कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींना या सुट्ट्या लागू राहतील.
दरम्यान, 1 एप्रिल 2026 हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी राखीव सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या दिवशी बँक व्यवहार बंद राहणार आहेत. शासन सुट्ट्यांची अधिकृत यादी लवकरच सर्व विभागांना पाठविण्यात येणार असून, कर्मचारी व नागरिकांना नियोजनासाठी ती उपयुक्त ठरणार आहे.





