( मुंबई )
देशातील बहुप्रतिक्षित जनगणना 2027 प्रक्रिया अखेर सुरू होत असून एप्रिल-मे 2026 पासून पहिला टप्पा म्हणजे घरांची नोंदणी सुरू होणार आहे. या वेळी संपूर्ण जनगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत घरांची नोंदणी होणार असून, फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या मोजणीचा टप्पा पार पडेल. ही संपूर्ण प्रक्रिया 2027 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जनगणना 2026-27 वेळापत्रक (महत्त्वाच्या तारखा)
- घरांची नोंदणी : एप्रिल/मे 2026 पासून
- स्वतः माहिती भरणे : 1 मे 2026 पासून
- लोकसंख्या मोजणी : फेब्रुवारी 2027
- अंतिम पूर्णता : 2027
पहिल्यांदाच ‘सेल्फ एन्ट्री’ सुविधा
यंदाच्या जनगणनेत नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. 1 मे 2026 पासून अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
प्रक्रिया कशी कराल?
- वेबसाइट उघडा
- मोबाईल नंबर टाका
- OTP व्हेरिफाय करा
- राज्य व भाषा निवडा (मराठी उपलब्ध)
- घर व कुटुंबाची माहिती भरा
- Final Submit केल्यावर SE ID मिळेल
- माहिती संकलक आल्यावर SE ID दाखवा
पहिला टप्पा: 33 प्रश्नांची माहिती
घरांची नोंदणी करताना नागरिकांकडून 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यात खालील बाबींचा समावेश असेल:
घर व बांधकाम माहिती
मकान क्रमांक, बांधकाम साहित्य, भिंत-छत प्रकार, वापर, घराची अवस्था, सदस्यसंख्या
कुटुंब व प्रमुख माहिती
परिवार प्रमुखाचे नाव, लिंग, सामाजिक घटक (SC/ST), घराची मालकी
सुविधा व संसाधने
पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाकघर, इंधन, सांडपाणी व्यवस्था
डिजिटल व उपकरणे
टीव्ही, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप
वाहने
सायकल, दुचाकी, चारचाकी
ही माहिती विचारली जाणार नाही
जनगणना प्रक्रियेदरम्यान खालील संवेदनशील माहिती विचारली जाणार नाही:
- बँक खाते नंबर
- आधार नंबर
- पॅन नंबर
- OTP
- मासिक उत्पन्न
30 लाख कर्मचारी तैनात; शिक्षकांवर ताण वाढणार
ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय मोहीम मानली जाते. देशभरात सुमारे 30 लाख सरकारी कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. एका माहिती संकलकावर सरासरी 150 ते 180 घरांची जबाबदारी असेल. या प्रक्रियेत शिक्षक, महसूल विभाग (तलाठी, ग्रामसेवक) आणि नगरपालिका कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षक संघटनांची नाराजी
शिक्षक संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:
- जनगणनेसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावेत
- शिक्षकांची भूमिका मर्यादित ठेवावी
- योग्य मानधन व प्रशिक्षण द्यावे
- शैक्षणिक कामावर परिणाम होऊ नये
जनगणना 2027 ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असली तरी शिक्षकांवर वाढणारा अतिरिक्त ताण हा मोठा मुद्दा ठरत आहे. कायद्याने सरकारला अधिकार असला तरी शिक्षणावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसरीकडे नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
Census Act 1948 अंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला जनगणना कामासाठी नियुक्त करू शकते. काम न केल्यास कारवाईची तरतूदही आहे. यंदा जनगणना पूर्णपणे डिजिटल होणार असून मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन केले जाईल. जिओ मॅपिंग तंत्रज्ञानामुळे कोणतेही घर वगळले जाणार नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- स्वतः माहिती भरल्यास प्रक्रिया सोपी होईल
- माहिती अचूक व पूर्ण भरा
- SE ID जतन करून ठेवा

