(नवी दिल्ली)
अवघ्या १८ महिन्यांच्या संसारानंतर पतीकडून १२ कोटी रुपयांची पोटगी, बीएमडब्ल्यू कार आणि मुंबईतील घराची मागणी करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुनावणी दरम्यान कडक शब्दांत फटकारले. “इतकी सुशिक्षित असूनही तुमचे पतीवर पूर्णपणे आर्थिक अवलंबित्व योग्य नाही. नोकरी करा आणि स्वतःच्या पायावर उभं रहा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
“पती श्रीमंत आहे म्हणून मागण्या करू नका”
महिला एमबीए पदवीधर असून IT क्षेत्रात कामाचा अनुभव असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. यावर सरन्यायाधीश गवई यांनी तिला विचारलं, “तुमच्याकडे शिक्षण आणि कौशल्य असतानाही नोकरी का करत नाही? बेंगळुरू, हैदराबादसारख्या शहरांमध्ये IT व्यावसायिकांची मोठी मागणी आहे.” महिलेने यावर उत्तर दिलं की, तिच्या पतीने तिला “सिजोफ्रेनिया आहे” असं खोटं सांगत घटस्फोट घेतला आणि तिच्यावर खोटे आरोप केले. “तुम्हाला खरंच सिजोफ्रेनिया आहे का असं वाटतं?” असा प्रश्न तिने न्यायालयालाच केला. यावर कोर्टाने स्पष्ट सांगितलं की, “तुम्हाला सिजोफ्रेनिया नाही. मात्र तुमच्या मागण्या अवाजवी आहेत, पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही. फक्त १८ महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतर एवढी मोठी आर्थिक मागणी कशी काय करता?”
“घर घ्या किंवा चार कोटी, आणि स्वतः आयुष्य उभं करा”
न्यायालयाने तिला दोन स्पष्ट पर्याय दिले: “मुंबईतील घर स्वीकारा किंवा चार कोटी रुपये घेऊन नोकरी शोधा.” महिलेने मात्र यावरही नाराजी दर्शवली. तिने असा आरोप केला की, “पतीने तिच्या वकिलालाही मॅनेज केलं आहे.” या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वकील माधवी दिवाण यांनी सांगितलं की, “महिलेच्या नावावर आधीच दोन कार पार्किंग आहेत, त्यातून ती उत्पन्न मिळवू शकते. ती मागत असलेली बीएमडब्ल्यू कार १० वर्ष जुनी असून सध्या स्क्रॅपमध्ये आहे.” महिलेने न्यायालयाला सांगितलं की तिच्यावर FIR दाखल असल्याने तिला कुणी नोकरी देणार नाही. यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले, “तुमच्यावरील सर्व तक्रारी रद्द करण्यात येत आहेत. आता कोणताही सबबीशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहा.”