(दापोली)
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा मानाचा १४ वा स्मृतिपुरस्कार यंदा दाभोळ परिसरात ‘देव माणूस’ म्हणून प्रसिद्ध असणारे कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार १४ डिसेंबर २०२५ रोजी, दाभोळ येथे, आयुष्मान भारत मिशन–महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते दिला जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे व मिहीर महाजन यांनी दिली.
२००१ पासून सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
कै. मामा महाजन यांचे माजी विद्यार्थी व स्नेही यांनी २००१ मध्ये प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी एका अप्रकाशित पण प्रभावी सामाजिक कार्यकर्त्याचा यथोचित सन्मान केला जातो. आतापर्यंत १३ मान्यवरांचा गौरव करण्यात आला असून, पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. २५,०००/- असे आहे. विशेष म्हणजे पुरस्कारार्थीची निवड प्रतिष्ठानतर्फे केली जाते आणि स्वतः जाऊन त्यांच्या मान्यतेनंतरच पुरस्कार दिला जातो, हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य.
६५ वर्षांची अतुलनीय रुग्णसेवा
या वर्षीचा पुरस्कार कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना त्यांच्या सहा दशकांहून अधिक आरोग्यसेवेतील अविरत योगदानासाठी दिला जात आहे.
डॉ. लुकतुके यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३५, आजरा (जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबात. बेताच्या परिस्थितीत आजरा, कोल्हापूर, नारायणगाव आणि अंमळनेर येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी G.S. Medical College, मुंबई येथून वैद्यकीय पदवी संपादन केली.
१९६० मध्ये एक तरुण MBBS डॉक्टर म्हणून दाभोळच्या सरकारी दवाखान्यात रुजू झाले आणि पुढे सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ रुग्णसेवेला वाहून घेतले.
त्यांची तपासणी क्षमता, रुग्णांच्या गरजा ओळखण्याची दृष्टी आणि पैशापेक्षा सेवेचे व्रत यामुळे पंचक्रोशीत त्यांना लोक ‘देव माणूस’ म्हणून पुकारत. रात्री-बेरात्री रुग्णांना तपासण्यासाठी गावोगावी जाण्याचा त्यांचा दिनक्रम ९० वर्षांपर्यंत कायम राहिला. १९६० ते २०२५ या सलग ६५ वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांची निस्वार्थ सेवा केली. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन यंदाचा स्मृतिपुरस्कार त्यांना अर्पण करण्यात येत आहे. पुरस्कार त्यांचे चिरंजीव केदार लुकतुके स्वीकारणार आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीने गौरवलेली परंपरा
या स्मृतिपुरस्कार सोहळ्याला यापूर्वी माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री रामभाऊ नाईक, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत..

