(दापोली /रत्नागिरी)
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दापोलीत २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्रवण निनाद ठाकुरदेसाई (रा. डोंबिवली पूर्व) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुरदेसाई कुटुंब दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रवणची आई आरोही ठाकुरदेसाई या त्याला चहासाठी बोलविण्यास गेल्या असता, बाथरूमच्या दरवाजाच्या हँडलला टॉवेलच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर नातेवाईक व इतरांनी तत्काळ धाव घेत श्रवणला खाली उतरवले. हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी सुमारे ६.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एवढ्या तरुण वयात आणि पर्यटनासाठी आलेल्या युवकाने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

