(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे–वातवाडी परिसरातील कापशी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी छापा टाकत मोठी धडक कारवाई असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन जेसीबी व डंपरसह सुमारे ३२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची फिर्याद मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (वय ४२, रा. देवरुख) यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी सुरज उदय नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून सक्शन पंपाच्या मदतीने सुमारे २५ ब्रस वाळू अवैधरित्या उपसून साठवून ठेवली होती. त्यानंतर शकील अहमद (वय २४, रा. उत्तर प्रदेश) व राजकुमार प्रजापती (रा. चिपळूण) हे दोघे घटनास्थळी दाखल होऊन संगनमताने वाळूचे लोडिंग व वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २५ ब्रस वाळू (अंदाजे किंमत २.५० लाख रुपये), एक जेसीबी (MH09/CL/0507 – किंमत अंदाजे २० लाख रुपये) आणि एक डंपर (MH08/W/8724 – किंमत अंदाजे १० लाख रुपये) असा एकूण ३२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
माखजन पोलिस दुरक्षेत्रात या प्रकरणी अ.क्र. ६२/२०२५ नुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मपोहेकॉ क्रांती आर. सावंत यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक.डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
संगमेश्वर तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले जात आहे.

