(दापोली)
दापोली तालुक्यातील चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांच्या रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन महिला शाखा डाकपाल सोनिया संदेश तेलप (वय 26, रा. मळे वरची वाडी, दापोली) यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2020 मध्ये घडलेल्या या आर्थिक गैरव्यवहारामुळे डाक विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी गुहागर येथील डाकघर निरीक्षक हिमांशु हरिश्चंद्र जोशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सोनिया तेलप या 9 जुलै 2020 ते 17 ऑगस्ट 2020 या कालावधीत चिखलगाव येथे शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होत्या.
या काळात त्यांनी पदाचा गैरवापर करून निलेश गोविंद घडवते, लक्ष्मी सखाराम शिगवण आणि सरिता गजानन कांबळे या तीन खातेदारांच्या खात्यांतून एकूण 36 हजार 600 रुपये परस्पर काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रकमेचा अपहार करून त्यांनी शासनासह खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

