(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये मात्र मंगळवारी दुपारी अचानक तणावाचे ढग दाटून आले. अजीजा दाऊद हायस्कूल मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार योगेश हळदवणेकर आणि शिंदे गटाचे उमेदवार निमेश नायर यांच्यात वाद चिघळत थेट धक्काबुककीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली.
दुपारी सुमारे २.३० वाजता हळदवणेकर मतदान केंद्रावर दाखल झाले असताना त्यांनी तेथे बोगस मतदान सुरू असल्याचा गंभीर आरोप केंद्राध्यक्षांकडे नोंदवला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक वाद उसळला. हळदवणेकर यांच्या तक्रारीनुसार, या वादाच्या भरात नायर यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताचा कोपरा मारत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर हळदवणेकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून, नायर हे सकाळपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारे देत असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला आहे. “माझ्या जीवाला धोका आहे,” असा दावा करत त्यांनी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शहरातील इतर सर्व प्रभागांत मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. मात्र प्रभाग २ मधील या धक्काबुकीच्या प्रकारामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
मतदान केंद्रात शांतता बिघडवणाऱ्यांना आवर घालणे जास्त गरजेचे
निवडणुकीसारख्या लोकशाही सणात उमेदवारांनीच हात उचलण्यापर्यंत परिस्थिती जावी, ही खेदाची बाब आहे. राज्यात नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत अशा अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या राड्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या दबंगगिरीच्या प्रकरणांवर पोलिसांनी ठोस आणि कठोर कारवाई करणे आता अत्यावश्यक झाले आहे. लोकशाहीच्या उत्सवातच काही जण गुंडगिरीचा सराव करत असतील, तर पोलिसांनी ‘फोटोसेशन’पुरता बंदोबस्त न ठेवता प्रत्यक्ष कृती दाखवण्याची वेळ आली आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीत हे नेहमीचे वाद, धक्काबुक्की, तक्रारी… आणि शेवटी ‘चौकशी सुरू आहे’ अशा जुनाट संवादावरच पडदा पडेल. लोकांनी मतदान करताना शांतता राखावी, हे सांगणाऱ्या प्रशासनाने आधी मतदान केंद्राच्या परिसरात शांतता बिघडवणाऱ्यांना आवर घालणे अत्यंत जास्त गरजेचे आहे.

