(मालवण)
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर ठरली आहे. दक्षिण कोकणातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दरवर्षी लाखो नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव येत्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आज (बुधवारी) सकाळी देवीचा हुकूम घेतल्यानंतर ही तारीख निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, आंगणेवाडीची जत्रा कोणत्याही तिथीनुसार ठरत नसून देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस जाहीर केला जातो.
यंदा यात्रेला दहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वस्त्रालंकारांनी सजलेल्या देवीचे दर्शन घेण्यासाठी कोकणासह महाराष्ट्रभरातून आणि देशविदेशातून भक्त मोठ्या संख्येने येतात. “देवीचे दर्शन घेतल्यावर मन:शांतीचा अनुपम अनुभव येतो,” अशी भावना भाविक व्यक्त करतात.
भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आंगणे कुटुंबियांसह संपूर्ण गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी सांगितले. यात्रेमुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि चाकरमानी मुंबईकरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
जत्रेची तारीख निश्चित होताच रेल्वे तिकिटे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंगसाठी मोठी चढाओढ सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राजकीय पक्षांचे नेते जत्रेस उपस्थित राहतात, त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच प्रशासनासही मोठ्या नियोजनाची कसोटी लागते.
भराडी देवीचे मंदिर हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर असले तरी ते सर्व भाविकांसाठी खुले असते. दरवर्षी या यात्रेला विविध राजकीय नेते, अधिकारी, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि लाखो सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. एका दिवसाच्या या यात्रोत्सवात प्रचंड मोठी गर्दी असते.
यात्रेचा कौल निश्चित झाल्यानंतर 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत धार्मिक विधींमुळे श्री भराडी देवी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. या काळात कुणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.

