(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिर्या–नागपूर महामार्गावरील हातखंबा परिसरात सुरू असलेल्या मार्गिकेच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हातखंबा ते साळवी स्टॉप या भागात रस्त्याचे काम तुकड्यात मार्गिका पूर्ण करण्यात आल्या असून त्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. वेगावर नियंत्रण नसल्याने हातखंबा परिसरात अपघातांचा धोका वाढला असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
डिमार्ट, कुवारबाव, कारवांचीवाडी, हातखंबा, शांतीनगर आणि जे.के. फाइल या भागांमध्ये नागरिकांसह वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, लोखंडी दुभाजक बसविण्याचे काम सुरू असल्याने ये–जा करण्याचे मार्ग बंद होत आहे. स्थानिक रहिवाशांना ५०० ते ६०० मीटरपर्यंत वळसा घ्यावा लागत आहे. महामार्गाचे रुंदीकरण होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना मुख्य रस्त्यांसंदर्भात कोणत्याही समस्या निर्माण होत नव्हत्या. मात्र महामार्ग झाल्यापासून अनेक समस्यांना स्थानिक नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसमोरून थेट अपघातांचा धोका वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे, वस्ती भागात कोणत्याही ठिकाणी दुभाजक ओपनिंग उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मार्ग मिळत नाही. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी कपिलानंद कांबळे यांनी ग्रामपंचायत हातखंबा मार्फत निवेदन सादर करून महामार्ग विभागाकडे तातडीने दुभाजक ओपनिंगची मागणी केली आहे. मात्र दोन महिने उलटून सुद्धा अद्याप कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याने एखादा अपघात झाल्यावरच एनएचएआय अधिकारी खडबडून जागे होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महामार्गावरील वाढता वेग आणि दुभाजक ओपनिंग नसल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. वस्ती भागाजवळ आवश्यक तेवढे दुभाजक ओपनिंग करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. स्थानिक जनतेच्या दैनंदिन सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या मागणीची दखल घ्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

