(रत्नागिरी)
रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. उद्घाटन कार्यक्रमावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून विरोध केला. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
रत्नागिरी येथे वक्फ बोर्ड कार्यालय उभारण्याची माहिती मंत्री सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. विधानसभा निवडणुका अगदीं तोंडावर आल्या आहेत. यातच आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कामांचे शुभारंभ, उद्घाटन समारंभ आयोजन केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वक्फ बोर्ड कार्यालय हे सामाजिक न्याय भवन येथे उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत येण्यापूर्वीच अनेक भाजप कार्यकर्त्यांसह हिंदुत्व कार्यकर्ते जमले होते. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांची देखील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली.
मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु या कार्यालयाच्या बाहेरच उद्घाटनापूर्वीच अनेक हिंदूत्व कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. उद्घटनाला जाणाऱ्या पालकमंत्री सामंत यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्नही काही कार्यकर्त्यांनी केला. त्यां कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र आंदोलकांनी मंत्री सामंत उद्घाटन कार्यक्रम आटोपून बाहेर येईपर्यंत काळे झेंडे दाखवून पालकमंत्री हटाव…., जय श्रीराम…, जय भवानी अशा घोषणा देत या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले, त्यावेळी देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी रत्नागिरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. वक्फ बोर्डाचं कार्यालय रद्द करावं, अशी मागणी ही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
सामंतांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले…
कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात हिंदू मुस्लिम सलोखा आहे सर्व जाती-धर्मात सलोख्याचे वातावरण आहे ते बिघडवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. आज मी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन केलं हे कार्यालय सहा महिन्यापूर्वी मंजूर झाले आहे. पण काही लोकांना ते काल कळलं आणि आज आमच्या मित्र पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मात्र काळे झेंडे मला दाखवले नाही तर ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कार्यालय सहा महिन्यांपूर्वी मंजूर केलं आहे त्यांनाच ते दाखवण्यात आले. मी प्रतिनिधिक होतो असे मी समजतो. अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे. मला वाटलं मला अडविण्यासाठी काळे झेंडे दाखवायला एक लाखभर लोक असतील, पण २५ लोक होती असं सांगत काळे झेंडे दाखवत हिंदू मुस्लिम सदृश्य वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.