(रत्नागिरी)
रुग्णसेवेतील समर्पण आणि उत्कृष्ट उपचार देण्याच्या ध्येयातून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाने एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. कान-नाक-घसा (ENT) विभागामार्फत चार गरजू महिलांवर अत्यंत क्लिष्ट थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या असून, या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क करण्यात आल्या.
पूर्वी जिल्ह्यात अशा प्रकारच्या जटिल शस्त्रक्रिया मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत्या. मात्र ENT विभाग प्रमुख तज्ज्ञ डॉ. सुनिता बागे यांच्या पुढाकारामुळे आता स्थानिक स्तरावरच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती प्राची गुरव (वय 42, गणेशगुळे), श्रीमती जानकी गुप्ता (वय 59, MIDC), श्रीमती चंदादेवी शहा (वय 42, कारवांची वाडी) आणि श्रीमती दिपश्री गोताड (वय 43, जाकादेवी) या चार महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासकीय रुग्णालयात एकही रुपया न घेता उपचार करण्यात आल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय देखरेख सुरू आहे.
संबंधित रुग्णांना काही महिन्यांपासून गळ्यात सूज, श्वास घेण्यास त्रास, अन्न गिळताना अडचण आणि आवाज बसणे अशा समस्या जाणवत होत्या. तपासणीत त्यांच्या थायरॉईड ग्रंथीत मोठी गाठ असल्याचे निदान झाले. अत्याधुनिक उपकरणे आणि अनुभवी वैद्यकीय टीमच्या मदतीने या सर्व शस्त्रक्रिया कोणतीही गंभीर गुंतागुंत न होता यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.
या प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख आणि डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी परिसेविका सुमन कोलापटे तसेच परिचारिका भावना कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. सुनिता बागे यांनी सांगितले की, “थायरॉईडसारख्या आजारांमध्ये योग्य वेळी निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. शस्त्रक्रियेदरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते, मात्र योग्य नियोजन आणि टीमवर्कमुळे हे यश मिळाले.”
रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. “आम्ही आर्थिक अडचणीत होतो, पण डॉक्टरांनी धीर देत योग्य उपचार केले. आता रुग्णांची प्रकृती सुधारत आहे,” असे त्यांनी सांगितले.
या कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. “अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया शांतपणे आणि कौशल्याने पूर्ण करणे हे त्यांच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाचेही विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली असल्याचे डॉ. बागे यांनी सांगितले.
या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता दर्जेदार उपचार स्थानिक स्तरावर मिळू शकतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

