(मुंबई)
शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपली वचनबद्धता अधिक ठळक करत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने एक महत्त्वाचा आणि अभिनव निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांलगत मधमाश्या व इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांच्या संवर्धनासाठी खास ‘बी कॉरिडॉर’ (Bee Corridor) विकसित करण्याचा देशातील पहिलाच उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आतापर्यंत शोभेच्या झाडांपुरते मर्यादित असलेले महामार्गांवरील वृक्षारोपण आता थेट पर्यावरणीय समतोलाच्या दिशेने वळणार आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत मधमाशी-अनुकूल वनस्पतींची रेषीय लागवड करण्यात येणार असून, वर्षभर फुलांचा बहर राहील अशी नियोजनबद्ध रचना केली जाणार आहे. यामुळे मधनिर्मिती आणि परागकणांची सतत उपलब्धता सुनिश्चित होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला विकसित होणारे हे ‘बी कॉरिडॉर’ परागकण संवर्धनासाठी एक अनोखी संधी ठरणार आहेत. सध्या पर्यावरणीय बदलांमुळे मधमाश्या आणि इतर परागीभवन सहाय्यक कीटकांवर मोठा ताण येत असून, त्याचा थेट परिणाम शेती, बागायती उत्पादन आणि पर्यावरणीय संतुलनावर होत आहे. NHAIचा हा उपक्रम हा ताण कमी करण्यास मदत करणार आहे.
या प्रकल्पांतर्गत झाडे, झुडुपे, औषधी वनस्पती आणि गवत यांचा समावेश असलेली विविध लागवड केली जाणार आहे. मधनिर्मितीस उपयुक्त आणि परागकणांनी समृद्ध अशा प्रजातींची निवड करण्यात येणार असून, परागीभवनासाठी उपयुक्त ठरणारे मृत लाकूड व पोकळ खोडांचाही नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे. वनस्पतींची निवड अशी असेल की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये फुलांचा बहर सुरू राहील आणि वर्षभर निसर्गचक्र अखंड चालू राहील.
राष्ट्रीय महामार्गांवर कडुनिंब, करंज, मोहवृक्ष, पळस, बॉटल ब्रश, जांभूळ आणि सिरीस यांसारख्या स्थानिक व हवामानाला अनुरूप प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. कृषी-हवामान परिस्थिती लक्षात घेऊन हे ‘बी कॉरिडॉर’ महामार्गाच्या पट्ट्यांवर तसेच NHAIच्या इतर रिकाम्या जमिनींवर विकसित केले जातील.
२०२६–२७ या कालावधीत NHAIची क्षेत्रीय कार्यालये किमान तीन परागीभवन क्षेत्रांमध्ये हा उपक्रम प्रत्यक्ष राबवणार आहेत. याच कालावधीत राष्ट्रीय महामार्गांजवळ सुमारे ४० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ६० टक्के झाडे ‘बी कॉरिडॉर’ अंतर्गत असतील.
हा अभिनव ‘बी कॉरिडॉर’ उपक्रम पर्यावरणीय संतुलन मजबूत करण्याबरोबरच परागकण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने NHAIचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

