(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या इयत्ता अकरावीच्या (११वी) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. या फेरीसाठी ४,१०,४९८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले असून, याशिवाय ८२,९५२ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
तिसऱ्या फेरीसाठी नव्याने अर्ज व पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत २२ ते २३ जुलै सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. आधी विद्यार्थ्यांना २६ ते २८ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत बदल करून आता विद्यार्थ्यांना २५ व २६ जुलै या दोन दिवसांतच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दोन फेऱ्यांनंतरही ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रतीक्षेत
आतापर्यंत झालेल्या दोन प्रवेश फेऱ्यांमधून ७,२०,६६६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. याच दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी १३,६२१ नव्या विद्यार्थ्यांनीही नोंदणी केली आहे. तरीही, एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन फेऱ्या पूर्ण होऊनही लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि उर्वरित विद्यार्थ्यांना अजून किती वेळ प्रतीक्षा करावी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रणाली लागू केली असली, तरी अद्यापही लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे पुढील फेऱ्यांत पुरेशी जागा उपलब्ध होणार का, याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

