(सिंधुदुर्ग)
“कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा… पण शिवसेनेला कोकणात सापडला आहे खरा हिरा!” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे जोरदार कौतुक केले. “शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही” या निलेश राणे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “पोटात एक आणि ओठात एक, हे मला जमत नाही. जो काम करतो, त्याच्या पाठिशी मी नेहमी उभा राहतो.”
निलेश राणे यांच्यातील आत्मविश्वास, धडाडी आणि राणे कुटुंबाचे ‘बाळकडू’ अधोरेखित करत शिंदे म्हणाले, “निलेश कधीच कोणाला घाबरत नाही. त्याने नारायण राणे यांचे बाळकडू घेतले आहे. इलाका किसी का भी हो… धमाका निलेश ही करेगा!”
मालवणच्या भविष्यासाठी निलेश राणे सातत्याने धावून येतात, असे सांगत शिंदेंनी भरभरून कौतुक केले. “मालवणचा पूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी माझी. निलेशनी प्रस्ताव द्यावा, मी शब्द पाळतो,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सभेदरम्यान “कोकणी माणूस फणसासारखा—बाहेरून काटेरी पण आतून गोड. त्यामुळेच कोकण ही शिवसेनेची कर्मभूमी आहे” असे म्हणत शिंदे यांनी कोकणाच्या स्वभाववैशिष्ट्यांनाही उजाळा दिला.
यावेळी महिलांची उपस्थिती मोठी असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी “ज्या उमेदवारांच्या पाठिशी महिला, त्यांची मतपेटीत नंबर एक. माझी लाडकी बहीण ममता वराडकर यांना निवडून द्या,” असे आवाहन केले.
रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या “1 नंबर हा नेहमी 1 नंबरच” या वक्तव्याला अप्रत्यक्ष टोला देताना शिंदे म्हणाले, “सगळीकडे लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त… कोणी मायका लाल आला तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही.”
काही दिवसांपासून सुरू असलेल्या निलेश राणे–रविंद्र चव्हाण यांच्या वादावर शिंदेंनी थेट भाष्य टाळले, मात्र निलेश राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष… शिवसेनेचं खणखणीत नाणं,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शेवटी शिंदे म्हणाले, “किती लावा शक्ती, किती लढवा युक्ती… कोणी किती करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला!”

