(लांजा / रत्नागिरी)
धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वैभव, संगीतकला आणि सामूहिक भक्तिभावाचा अनोखा संगम घडविणाऱ्या लांजा तालुक्यातील मौजे शिपोशी येथील श्री हरिहरेश्वर देवस्थानच्या १२६ वर्षांच्या त्रिपुरोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता होत आहे. कार्तिक नवमी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाने शतकाहून अधिक काळ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन केले आहे. कीर्तन, शास्त्रीय संगीत, नाट्यकला, वादन आणि पारंपरिक भोवत्या ही या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
कोकणातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या उत्सवाची सुरुवात सुमारे १२६ वर्षांपूर्वी शिपोशी येथील आठल्ये कुटुंबीयांनी केली. भगवान शंकराच्या उपासनेशी जोडलेला हा उत्सव आजही पूर्वापार चालत आलेल्या शिस्तबद्ध नियोजनानुसार आणि तितक्याच श्रद्धेने साजरा केला जातो. पिढ्यान्पिढ्या जपलेल्या या परंपरेमुळे शिपोशीच्या त्रिपुरोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कीर्तन आणि संगीतकलेचा समृद्ध वारसा
उत्सवाच्या प्रारंभी आरत्या, भोवत्या, मंत्रजागर आणि त्यानंतर विद्वान कीर्तनकारांची कीर्तने किंवा कीर्तनाची जुगलबंदी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरातील कीर्तन-जुगलबंदीची संकल्पना सर्वप्रथम यशवंत आठल्ये यांच्या कल्पकतेतून साकारल्याचे कीर्तनकार बुवा सांगतात. त्यामुळे या उत्सवाला धार्मिक परंपरेसोबतच एक वेगळे सांस्कृतिक वैशिष्ट्यही लाभले आहे.
कीर्तन हे केवळ मनोरंजन किंवा आध्यात्मिक भक्तीचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. धर्म, नीतीमत्ता, दैनंदिन आचरण आणि भक्ती यांचा संगीताच्या माध्यमातून सुरेख मेळ घालत कीर्तनकार पूर्वरंग आणि उत्तररंगातून विविध विषय सोप्या भाषेत मांडतात. समाजातील अनिष्ट रूढींवर भाष्य करत सकारात्मक विचार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून केले जाते.
कार्तिक दशमीपासून आरत्या आणि भोवत्यांसह शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, एकल वाद्यवादन, संगीत नाटक आणि नकला अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळते. या मंचावर देशातील अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.
कीर्तन क्षेत्रात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे वडील श्री. बाळूबुवा अभिषेकी, कराडकर बुवा म्हणजेच शंकराचार्य, मकरंद बुवा सुमंत रामदासी, आफळे बुवा यांच्यासह अनेक नामवंत आणि कीर्तिवंत कीर्तनकारांनी सेवा अर्पण केली आहे.
संगीत क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशी, पंडित राम मराठे, छोटा गंधर्व, बालगंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर यांसारख्या दिग्गज कलाकारांपासून ते नव्या पिढीतील अद्वैत दादरकर यांच्यापर्यंत अनेक गायकांनी येथे आपली गायनसेवा सादर केली आहे. वादन क्षेत्रात गोविंदराव पटवर्धन, पंडित सुरेश तळवलकर, पंडित अंतरकर, पंडित विश्वनाथ कान्हेरे यांच्यासह अनेक नामवंत वादकांचे एकल वादन आणि जुगलबंदीचे कार्यक्रम झाले आहेत.
शिपोशीसारख्या ग्रामीण भागात अशा दिग्गज कलाकारांची कला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणे, ही रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरली आहे. याशिवाय रंगशारदा आणि साहित्य संघ यांसारख्या नामांकित संस्थांच्या दर्जेदार नाट्यकृतीही या सांस्कृतिक व्यासपीठावर सादर झाल्या आहेत. वर्षानुवर्षे या कार्यक्रमांचे सातत्य टिकवून ठेवण्यात उत्सव आयोजकांना यश आले आहे.
एकादशीचे प्रवचन आणि विविध धार्मिक विधी
कार्तिक एकादशीला उत्सवात विशेष प्रवचनाचे आयोजन केले जाते. निवडलेल्या विषयाचे सखोल निरूपण या प्रवचनातून केले जाते. अनेक नामवंत प्रवचनकारांनी या उत्सवात सहभागी होऊन आपली सेवा अर्पण केली आहे. गेल्या १२६ वर्षांत या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांची नावे सांगायची झाल्यास त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल, एवढा मोठा या उत्सवाचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रवास आहे.
उत्सवाच्या काळात दिवसभर लघुरुद्र, महारुद्र, नवचंडी, शतचंडी आणि रुद्रस्वाहाकार अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. यजमान आणि संस्थेच्या वतीने विप्रांच्या हस्ते हे विधी दरवर्षी श्रद्धापूर्वक संपन्न होतात.
पारंपरिक भोवत्या ठरतात उत्सवाचे प्रमुख आकर्षण
श्री हरिहरेश्वर देवस्थानच्या त्रिपुरोत्सवातील सर्वाधिक आकर्षण म्हणजे पारंपरिक भोवत्या. विविध चालींवर पदे म्हणत फेर धरून मंदिराच्या प्रांगणात हा पारंपरिक नृत्यप्रकार सादर केला जातो. पखवाज, नाल आणि तबल्याच्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विविध ताल-चालींमध्ये भगवान शंकरासमोर भोवत्या खेळल्या जातात.
या पारंपरिक भोवत्या पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून भाविक तसेच कलाप्रेमी शिपोशी येथे दाखल होतात. प्रदक्षिणा, भोवत्या आणि आरत्यांचा दररोजचा क्रम वेगवेगळा निश्चित केलेला असतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी भाविकांना वेगळा अनुभव मिळतो. परंपरेचे सातत्य कायम ठेवतानाच कार्यक्रमांमध्ये वैविध्य जपण्याची ही पद्धत उत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करते.
नव्या पिढीवर धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार
ग्रामीण भागातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्यात अशा उत्सवांचे योगदान महत्त्वाचे आहे. केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता नव्या पिढीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कार घडविण्याचे कार्यही या उत्सवातून होते. स्वयंशिस्त, कौटुंबिक योगदान, सामूहिक सहभाग, संगीताची जाण, शास्त्रज्ञान आणि परंपरेविषयी आदर या मूल्यांची रुजवण नकळतपणे पुढील पिढीत होत असते.
उत्सवाच्या अंतिम दिवशी दुपारी समाराधनेचे आयोजन केले जाते. यावेळी श्रींचा प्रसाद भक्तांना दिला जातो. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेनंतरच्या उगवत्या पहाटे लळीताच्या कीर्तनाने आणि काकड आरतीने उत्सवाची सांगता होते. कीर्तनकार बुवांकडून उत्सवाचे महत्त्व सांगत प्रार्थना केली जाते. पुढील वर्षीही हा उत्सव त्याच भक्तिभावाने साजरा करण्याचा संकल्प मनाशी बाळगून भाविक आनंदाने आपापल्या मार्गाला लागतात.
अशा प्रकारे १२६ वर्षांची परंपरा जपत शिपोशी येथील श्री हरिहरेश्वर देवस्थानचा त्रिपुरोत्सव भक्ती, संगीत, नाट्यकला, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम घडवितो. वर्षानुवर्षे जपल्या जाणाऱ्या या सांस्कृतिक वारशामुळे शिपोशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडत आहे. पुढील वर्षीच्या उत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा करत भाविक वर्षभर श्री हरिहरेश्वराच्या कृपाछत्राखाली मार्गक्रमण करतात.


