( मंडणगड / वृत्तसंस्था )
जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या नळपाणी योजनांची कामे आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला कामाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली न करता कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पंचायत समिती मंडणगड येथील राजमाता जिजाऊ सभागृहात जलजीवन मिशन नळपाणी योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती मंडणगडच्या सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह ग्रामसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यमंत्री कदम यांनी मंडणगड तालुक्यातील १४ नळपाणी योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यापैकी ७५ ते १०० टक्के कामे पूर्ण झालेल्या काही योजना किरकोळ तांत्रिक अडचणी किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (एमएसईबी) प्रलंबित जोडणीमुळे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. अशा सर्व योजनांची उर्वरित कामे पुढील १४ ते १५ दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंडणगड तालुक्यातील १०५ गावांमधील पाणीप्रश्न आणि प्रलंबित योजनांची अद्ययावत माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे तसेच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली जात नसल्याचे निदर्शनास आल्याने कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे सर्व १४ योजनांच्या कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात तालुक्यात पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून टँकरची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने डोंगराळ आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या टँकरऐवजी लहान टँकरची मागणी नोंदवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. स्वतंत्र टँकर खरेदीसाठीही तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तालुक्यातील शासकीय तसेच खासगी विहिरी आणि बोअरवेल यांसारख्या जलस्रोतांची आताच पाणी तपासणी करावी. आवश्यकतेनुसार खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण करण्याबाबतही प्रशासनाने पूर्वनियोजन करावे, असे कदम यांनी सांगितले.
याशिवाय, तालुक्यात उभारण्यात आलेल्या ३१० वनराई बंधाऱ्यांमुळे किती जलस्रोतांचे बळकटीकरण झाले, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. नादुरुस्त वनराई बंधारे आणि पाण्याच्या चेंबर्सच्या दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने अंदाजपत्रके (इस्टिमेट) तयार करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दरम्यान, तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे प्राप्त होणाऱ्या निवेदनांची संख्या, तसेच त्या निवेदनांवर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील काही दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासोबतच संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष कामातून परिणाम दाखवावेत, असा स्पष्ट संदेश त्यांनी या बैठकीतून दिला.


