(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
बैलांना आखूड दोरीने बांधून, दाटीवाटीने वाहनात कोंबून आणि त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था न करताच वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकअप पुर-बेलेवाडी येथे पलटी झाली. या अपघातात दोन्ही बैल जखमी झाले असून, वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे स्वतःलाही दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तेजस विजय सातपुते (वय २५) आणि संकेत शिवाजी सातपुते (वय ३२, दोघेही रा. डोणोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हे महिंद्रा बोलेरो पिकअपमधून दोन बैलांची वाहतूक करीत होते. बैलांच्या मानेला वेदना होतील अशा प्रकारे आखूड दोरीने बांधून, त्यांना हालचाल करता येणार नाही इतक्या दाटीवाटीने वाहनात कोंबण्यात आले होते. वाहनाच्या हौद्याला चारही बाजूंनी बंदिस्त करण्यात आले होते. बैलांना दुखापत होऊ नये यासाठी आवश्यक पार्टिशन नव्हते. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. तसेच चारा-पाणी, प्रथमोपचार पेटी आणि गुरे वाहतुकीचा दर्शनी फलक यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. आवश्यक परवान्याशिवाय ही वाहतूक सुरू असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पुर ते देवरुख मार्गावरील रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालकाने बोलेरो पिकअप भरधाव वेगाने आणि हयगयीने चालविली. त्यामुळे पुर-बेलेवाडी येथे रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहन पलटी झाले. या अपघातात वाहनातील दोन्ही बैल जखमी झाले. त्यापैकी एका बैलाच्या पोटाजवळील चामडी सुमारे १० ते १२ इंच फाटून रक्तस्राव होत होता. मागील पायाच्या खुराजवळही जखम झाली होती. दुसऱ्या बैलालाही दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपघातात २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप आणि ६ हजार व ८ हजार रुपये किमतीचे दोन बैल, असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किरदाडी गावचे पोलीस पाटील निलेश श्रीनिवास पेंडणेकर यांनी याबाबत फिर्याद दिली.
या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ व त्यातील दुरुस्ती नियम २००१, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, केंद्रीय मोटार वाहन नियम तसेच भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.११ वाजता देवरुख पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.


