(पुणे / वृत्तसंस्था)
न्यायालयीन कामकाजासाठी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात आलेल्या मंदार किवळे याच्यावर न्यायालय परिसरातच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न लागल्याने किवळे बचावल्याचे लक्षात येताच आरोपींनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचे दोन्ही तोडले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. २०२५ मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास न्यायालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. पाच जण दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले होते. त्यांनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने अर्थात ‘मिस फायर’ झाल्यामुळे किवळे याला गोळी लागली नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी जवळील कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला. कोयत्याचे वार करण्यात आल्यानंतर मंदार किवळे फूटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
कोयत्याने डोक्यावर वार होत असल्याचे पाहून किवळेने बचावासाठी दोन्ही हात वर केले. त्यामुळे कोयत्याचे वार त्याच्या हातांवर बसले. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे होण्याइतके गंभीर जखमी झाल्याचे घटनास्थळावरील दृश्यांमधून दिसून येत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून, पुढील ७२ तासांनंतरच प्रकृतीबाबत स्पष्टता येईल, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. न्यायालयात हजेरी लावण्यासाठी तो आला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. किवळे तुरुंगातून बाहेर आल्याचे समजल्यानंतर आरोपींनी एक ते दोन दिवसांपासून त्याचा माग काढण्यासाठी ‘ट्रॅप’ लावला होता. तो न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हल्लेखोरांनी दबा धरून हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यामागे २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शुभम चव्हाण याचा भाऊ अक्षय चव्हाण हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंदार किवळे याला संपवण्यासाठी त्याने सुपारी दिल्याचेही सांगितले जात आहे. अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण अशी संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कात्रज परिसरात २०२५ मध्ये शुभम चव्हाण या तरुणाची हत्या झाली होती. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली होती. शुभम चव्हाण हा कात्रजमधील संतोष नगर परिसरात राहत होता. त्याचे त्याच भागात रेस्टॉरंटही होते. घराशेजारील जमिनीवरून त्याचा अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद सुरू होता. या वादातून चार जणांनी लाकडी ओंडके, बांबूच्या काठ्या आणि स्टंपने शुभमला मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते.
या प्रकरणाचा तपास करताना आंबेगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. या हत्या प्रकरणात मंदार किवळे याचाही आरोपी म्हणून समावेश असून, तो तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता.
शुभम चव्हाणच्या हत्येला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी संबंधित आरोपींना संपवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून मंदार किवळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले आणि न्यायालयात येण्याची संधी साधून हल्ला करण्यात आला, अशी माहिती समोर येत आहे.
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.


