(मुंबई)
महायुतीची सत्ता जरी एकत्र येऊन प्रस्थापित झाली असली, तरी तिन्ही पक्षांतील म्हणजेच अजित पवार गटाची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा अंतर्गत अविश्वास आणि राजकीय कुरघोडी सातत्याने वाढताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान हा तणाव अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यकर्त्यांना पळवून नेणे, गटबाजी, बदनामी, पोस्टरयुद्ध अशा प्रकारांनी स्थानिक राजकारण तापले आहे. राज्याची तिजोरी कोणाच्या हातात? खरी ताकद कोणाची? वर्चस्व कुणाचे? या प्रश्नांवरून नेते खुलेआम शब्दयुद्ध करताना दिसतात. सत्ताधा-यांपैकीच प्रत्येकजण स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी एकमेकांना अडचणीत आणताना दिसत आहे.
दिल्लीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मतभेदांचे रूप उघडपणे समोर आले. महत्त्वाची बैठक असूनही राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे, तसेच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे प्रमुख चेहरे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील अस्वस्थता आणि अंतर्गत तणावाचा संदेश स्पष्ट गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी या तणावाला अधिक हवा देत आहे. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असलेल्या या निवडणुका महायुतीने एकजुटीने लढवल्या जात नाही आहेत. उलट, तीनही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्याने अनेक शहरांमध्ये महायुतीचेच उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना पळवून नेणे, गटबाजी, बदनामी, पोस्टरयुद्ध अशा प्रकारांनी वातावरण अधिक तापले आहे. ‘‘सत्तेवर कोणाचे वर्चस्व?’’, ‘‘खरी ताकद कुणाची?’’ या प्रश्नांवरून नेतेमंडळी खुलेआम शब्दयुद्ध करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांमध्येच एकमेकांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अलीकडे भाजप–शिंदेसेना यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेशले. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरला. त्यानंतर नाराज शिवसेनेने मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावली. काही शिवसेना खासदारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘आपले लोक फोडाफोडी करत आहेत’ अशी तक्रार केली.
यावर फडणवीसांनीही प्रत्युत्तर देताना, ‘‘फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच केली होती,’’ असा टोमणा मारला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत ‘एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर डोळा ठेवणार नाही’ असा तात्पुरता तह झाला असला, तरी तो किती काळ टिकेल याबाबत राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान अजित पवार गटही स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी निर्णय, निधी वाटप, पक्ष संघटन या मुद्यांवर त्यांची नाराजी असल्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या चर्चांना अनुपस्थिती दाखवणे हेही त्याचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महायुतीत समन्वयाची पूर्णपणे कमतरता असल्याचे स्पष्ट दिसते. प्रत्येक पक्ष स्वत:चा अजेंडा पुढे रेटताना दिसत आहे.

