(माथेरान)
माथेरान घाटात सोमवार, ८ जुलै रोजी दुपारी एक भीषण अपघात घडला. हैदराबादहून पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांच्या अर्टिगा कारचे ब्रेक फेल झाल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट लोखंडी रेलिंगवर आदळून हवेत उडाली. त्यानंतर ती खालील वळणावर असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकून उलटली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून एका तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे.
ही घटना माथेरानच्या जुमापट्टी रेल्वे स्थानकाजवळ घडली. हैदराबादमधील गुंटूर जिल्ह्यातील साकेत राम, रेयूत त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी आणि तेजस्वी इम्कोरल हे सहा तरुण ७ जुलै रोजी माथेरानमध्ये पर्यटनासाठी दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात घाट उतरत असताना चालक त्रिलोक यांच्या कारचे ब्रेक अचानक निकामी झाले.
ब्रेक फेल झाल्यानंतर कार प्रथम लोखंडी रेलिंगवर आदळली आणि तेथून उडून सिमेंटच्या कठड्याला धडकली. धडकेनंतर कार उलटून रस्त्यावर पडली, ज्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताची तीव्रता प्रचंड होती, मात्र एअरबॅग्स उघडल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर जवळपास अर्धा तास कोणतीही मदत पोहोचली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे हे आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानिक टॅक्सीच्या साहाय्याने रायगड रुग्णालयात दाखल केले.
जखमींना डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातातून सहा पर्यटक थोडक्यात बचावले असून एक मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे.