(फ्लोरिडा, अमेरिका)
जगप्रसिद्ध WWE रेसलर आणि कुस्तीविश्वातील लीजेंड हल्क होगन यांचे वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गुरुवारी, २४ जुलै २०२५ रोजी सकाळी त्यांनी फ्लोरिडामधील क्लिअरवॉटर येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. TMZ Sports ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आपत्कालीन वैद्यकीय सेवेला होगन यांच्या घरी बोलावण्यात आलं होतं. कॉलमध्ये “कार्डियाक अरेस्ट” बाबत माहिती देण्यात आली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत हलवलं, मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
WWE कडून श्रद्धांजली
WWE ने आपल्या अधिकृत X (माजी ट्विटर) खात्यावर शोक व्यक्त करत म्हटले, “WWE हॉल ऑफ फेमर हल्क होगन यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. १९८० च्या दशकात WWE ला जागतिक स्तरावर पोहोचवण्यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लाखो चाहत्यांना WWE कडून भावपूर्ण श्रद्धांजली.”
US Weekly च्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीच हल्क होगन यांची मोठी हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्यावर त्यांच्या पत्नी स्काय यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, “हल्क यांचे हृदय पूर्णपणे ठणठणीत आहे आणि ते उत्तमरीत्या बरे होत आहेत.” मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतला.
हल्क होगन यांचे मूळ नाव टेरी जीन बोलिया होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९५३ रोजी ऑगस्टा, जॉर्जिया येथे झाला होता आणि ते फ्लोरिडाच्या पोर्ट टॅम्पा भागात वाढले. १९७७ साली वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी व्यावसायिक कुस्तीमध्ये पदार्पण केलं आणि थोड्याच काळात ‘हल्क’ या नावाने जगभर प्रसिद्ध झाले.
WWE मधील दैदीप्यमान कारकीर्द
हल्क होगन हे १९८० च्या दशकात WWE चे सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी चेहरा होते. त्यांचा लाल-पिवळ्या पोशाखातील रिंगमधील अवतार आजही चाहत्यांच्या मनात कोरलेला आहे.
- त्यांनी WWE चॅम्पियनशिप सहा वेळा जिंकली.
- १९८४ मध्ये ‘द आयर्न शेक’ ला पराभूत करत WWE चॅम्पियनशिप पटकावली आणि “द रिअल अमेरिकन” म्हणून ओळख मिळवली.
- ते MTV वरील WrestleMania आणि Saturday Night Live सारख्या शोमध्येही झळकले.
- ‘रोडी रॉडी पाइपर’, ‘किंग कॉंग बंडी’, ‘अल्टिमेट वॉरिअर’ यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांसोबतचे त्यांचे सामने WWE इतिहासात अजरामर मानले जातात.
- २००५ मध्ये WWE हॉल ऑफ फेममध्ये त्यांना पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आले.
- २०२० मध्ये ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ (nWo) या प्रसिद्ध गटाचा भाग म्हणून पुन्हा एकदा हॉल ऑफ फेमचा मान देण्यात आला.
हल्क होगन यांच्या निधनाने फक्त WWE नव्हे, तर संपूर्ण खेळविश्वाने एक तेजस्वी, करिष्माई आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावलं आहे. त्यांच्या कामगिरीची आठवण आणि त्यांचा वारसा लाखो चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहील.