(सिंधुदुर्ग)
तळकोकणातील मालवणमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अक्षरशः धगधगत आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु असताना आता शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी भाजपवर थेट पैशांचे वाटप करण्याचे गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करत “पैसे वाटपाचे कटकारस्थान रचले जात असल्याचा” दावा राणेंनी केला असून, मालवणमधील एका घरावर स्वतः धाड टाकल्यानंतर त्यांनी हा आरोप सार्वजनिक केला.
राणेंच्या कारवाईदरम्यान “रोख रकमेने भरलेली बॅग” सापडल्याचा दावा करण्यात आला असून, अशाच स्वरूपाच्या ८ ते १० घरांमध्येही पैशांचे साठे ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. या घटनाक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरपरिषद निवडणुका डोळ्यांसमोर असताना निलेश राणे आणि भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यातील शाब्दिक संघर्ष आधीच चांगलाच तापलेला होता. त्यातच भाजपचे पदाधिकारी यांच्या घरी टाकलेल्या धाडीनंतर वातावरण आणखी तणावपूर्ण बनले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
राणेंनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नुकत्याच झालेल्या मालवण दौर्याचा संदर्भ देत, “ते येथे येऊन गेले आणि लगेचच हे ‘नाटक’ सुरू झाले,” असा थेट आरोप केला. पकडलेल्या बॅगेत तब्बल २५ लाखांची रोकड असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, दबावमुक्त निवडणुकीची मागणी करत, “जर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतील तर आम्ही स्वतः बंदोबस्त करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणावर भाजपने त्वरित प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, प्रदेशाध्यक्ष घरी गेले म्हणजे त्यांनी पैसे नेले, असा अर्थ होत नाही. निलेश राणे यांना अपुरी किंवा चुकीची माहिती मिळाली आहे. भाजप कधीही पैसे वाटपाची पद्धत अवलंबत नाही, हे पक्षाच्या संस्काराशी विसंगत असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच, राणे हे सध्या सिंधुदुर्गामध्ये भाजपचे प्रमुख विरोधक म्हणून काम करत असल्याने केलेले आरोप राजकीय हेतूपुरते बिनबुडाचे असल्याचे बन यांनी म्हटले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ
राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्याआधीच मालवणमध्ये झालेल्या या ‘लक्ष्मी-दर्शनाने’ राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि गदारोळ निर्माण केला आहे. आता पोलिसांच्या तपासातून नेमके काय समोर येते, याकडे तळकोकणासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

