(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जन्म-मृत्यूची वेळ कोणाच्या हातात नसते, याची प्रचिती संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथे बुधवारी आलेल्या एक गंभीर घटनेतून पुन्हा एकदा आली. मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय तरुणाने झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक, गवत मारण्याचे विष आणि फिनेल प्राशन करत जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाइकांच्या दक्षतेमुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले.
ही घटना बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता घडली. गेल्या चार वर्षांपासून मानसिक आजाराशी झुंज देत असलेल्या या तरुणावर देवरुख येथे उपचार सुरू होते. दीर्घकाळ चाललेले उपचार आणि वाढत्या ताणतणावामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. अखेर बुधवारी तणावाच्या भरात त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला.
घरातील व्यक्तींना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविले. येथून अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिकित्सकांच्या देखरेखीखाली स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

