(मुंबई / निलेश कोकमकर)
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम कोकणवासीयांसाठी एक मोठं दुःस्वप्न ठरलं आहे. अर्धवट कामामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. कोकणच्या सर्वांगीण विकासाला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.
या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत, गावस्कर सभागृह, मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव (पूर्व), दादर, मुंबई येथे एक महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात येत आहे.
रखडलेली प्रगती, वाढलेली प्रतीक्षा
२०११ साली सुरू झालेल्या या महामार्ग प्रकल्पाला आज १५ वर्षे उलटून गेली, तरीही अनेक ठिकाणी रस्ते व पूल अर्धवट स्थितीत आहेत. दुसरीकडे, मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग यांसारखे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत वेळोवेळी आश्वासनं मिळाली, पण प्रत्यक्षात फारसा फरक पडलेला नाही.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २०२४ च्या अखेरीपर्यंत काम पूर्ण होईल, असं सांगितलं होतं. पण २०२५ उजाडूनही कोकणवासीयांना केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं जात आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे.
महामार्गाचे महत्त्व
हा ५७० किलोमीटर लांबीचा महामार्ग पनवेलपासून गोव्यापर्यंत पसरलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी कोकणाचा दळणवळण सुलभ होतो. पर्यटन, व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
आता गप्प बसायची वेळ नाही!
सरकारकडून वारंवार डेडलाइन जाहीर केल्या जातात, पण अंमलबजावणीचा वेग अत्यंत संथ आहे. कोकणवासीयांच्या संयमाची आता परीक्षा होत आहे. म्हणूनच, कोकणवासीयांनी एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याची हीच योग्य वेळ आहे.
आपण एकत्र का येतो आहोत?
- महामार्गाच्या रखडलेल्या कामावर जाहीर प्रश्न उपस्थित करण्यासाठी.
- अपघातांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळवण्यासाठी.
- कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी.
- आपल्या हक्कांसाठी आवाज उठवून प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी.