(ठाणे)
“स्पेशल चाईल्ड काही करू शकत नाही” हा समाजातील गैरसमज खोटा ठरवत ठाण्याचा मयुरेश कोटियन राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक स्पर्धेत चमकला आहे. पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये मयुरेशनं 100 मीटर रिंगिंग आणि लॉंगजंप या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. त्याच्या या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाण्यातील वाघबीळ येथे राहणारा 25 वर्षीय मयुरेश कोटियन लहानपणापासून धावण्याच्या शर्यतीत अपवादात्मक कौशल्य दाखवत होता. श्री माँ स्नेहदीप शाळेच्या स्पेशल चाईल्ड वर्गात त्याचं शिक्षण पूर्ण झालं. “स्पेशल चाईल्ड असल्यामुळे भविष्य अंधारात” असा समाजातील सर्वसामान्य विचार न मानता कोटियन कुटुंबानं त्याच्या प्रत्येक गुणाला प्रोत्साहन दिलं.
यानंतर मयुरेशला NASEOH (National Society for Equal Opportunity for the Handicapped) संस्थेत दाखल करण्यात आले. येथे त्यानं तांत्रिक शिक्षणासोबत धावण्याचा सरावही कायम ठेवला. विविध स्थानिक आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके जिंकून आपली क्षमता सिद्ध केली.
पॅराऑलिंपिक चॅम्पियनशिपची माहिती मिळाल्यानंतर मयुरेशनं व्यावसायिक पातळीवर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरु केली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या राज्य पॅराऑलिंपिक स्पर्धेत त्यानं 100 मीटर रिंगिंग आणि लॉंगजंप या दोन्ही प्रकारात सुवर्णपदकांची दुहेरी कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मयुरेशच्या या उल्लेखनीय यशामागे NASEOH संस्थेचे कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी, शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांचे अथक मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले.

