( पुणे )
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुण्यात धडक कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल ₹४६ लाख ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रमोद चिंतामणी (वय ३५) असे असून, तो सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता.
एसीबीने पुणे शहरातील रस्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी चिंतामणीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ कोटींची मागणी; पहिला हप्ता घेताना अटक
तक्रारदाराच्या वडिलांना गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांचा जामीन मिळवून देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराच्या आशिलाकडून तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. यापैकी १ कोटी स्वतःसाठी आणि १ कोटी आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला देण्याचे आरोपीने सांगितले होते. तक्रारदाराने या मागणीबाबत एसीबीकडे लेखी तक्रार केली. २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पडताळणी दरम्यानही आरोपीने हीच मागणी कायम ठेवली, त्यानंतर रविवार (२ नोव्हेंबर २०२५) पहिल्या हप्त्याचा व्यवहार ठरवण्यात आला.
रविवारी सापळा रचून एसीबीने आरोपी प्रमोद चिंतामणीला ₹४६ लाख ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले. झडतीदरम्यान पोलिसांना ₹४५ लाख ५० हजारांची रोख रक्कम, ₹१.५ लाखांच्या खऱ्या नोटा आणि ₹४५ लाखांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. याशिवाय सॅमसंग फोल्ड आणि आयफोन मोबाईल, रोख ₹३,६००, तसेच शासकीय ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

