(मुंबई)
कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नव्या संकटाचे कारण ठरत आहे. एआयच्या साहाय्याने तयार होणारे मॉर्फ व्हिडिओ, बनावट फोटो आणि आवाजाच्या क्लिप्समुळे कलाकारांच्या वैयक्तिक हक्कांवर आणि प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय, ऋतिक रोशन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, आशा भोसले, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक कलाकारांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही या यादीत सामील झाली आहे.
वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी हायकोर्टात याचिका
शिल्पा शेट्टीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, तिच्या व्यक्तिमत्वाचा विनापरवानगी व्यावसायिक व वैयक्तिक फायद्यासाठी होणारा गैरवापर थांबवावा, अशी मागणी केली आहे. तिचे बदनामीकारक, मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रं प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयानं तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती तिने केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
याचिकेनुसार, काही वेबसाइट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून शिल्पा शेट्टीचे मॉर्फ व्हिडिओ, बदललेली छायाचित्रं आणि बनावट कॉन्टेंट प्रसारित केला जात आहे. हा प्रकार तिच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पानं याचिकेत 27 वेबसाइट्सची अधिसूचना दिली असून, या साइट्सवर तिच्या छायाचित्रांचा बेकायदेशीर वापर करून विविध गोष्टींचा प्रचार केल्याचा दावा आहे.
तिचे वकील सना रईस खान यांनी न्यायालयात मांडलेल्या याचिकेत म्हटले आहे की, अनेक दशकांच्या मेहनतीतून शिल्पानं स्वतःची ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण केली आहे. कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तिच्या पूर्वपरवानगीशिवाय तिचं नाव, प्रतिमा किंवा छायाचित्र व्यावसायिक वापरासाठी वापरण्याचा अधिकार नाही. तिच्या प्रतिमेचा अनधिकृत वापर हा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेवर थेट हल्ला आहे. शिल्पा शेट्टीच्या व्यक्तिमत्वाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि तिचे वैयक्तिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालयाने तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची हायकोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

