(ग्लासगो)
भारताला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games) यजमानपद मिळाले आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे बुधवारी झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला अधिकृत यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हा शताब्दी वर्षाचा सोहळा भारतात रंगणार आहे. पहिली कॉमनवेल्थ स्पर्धा 1930 साली कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली होती.
20 वर्षांनंतर भारताला पुन्हा यजमानपद
अहमदाबादची निवड झाल्याने भारत 20 वर्षांनंतर पुन्हा कॉमनवेल्थ स्पर्धांचे आयोजन करणार आहे. याआधी 2010 मध्ये नवी दिल्ली येथे ही स्पर्धा झाली होती. त्या वेळी भारताने 38 सुवर्ण पदकांसह एकूण 101 पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. अहमदाबादच्या योजनेची पाहणी करण्यासाठी कॉमनवेल्थ स्पोर्ट्स बोर्डाने दोन वेळा गुजरातचा दौरा केला. पायाभूत सुविधा, क्रीडांगणे आणि शहराच्या तयारीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर अहमदाबादला यजमानपद जाहीर करण्यात आले.
7 जून 2025 रोजी भारतीय शिष्टमंडळाने लंडनमध्ये प्राथमिक सादरीकरण केले होते. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर 29 ऑगस्ट 2050 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हर्ष संघवी, पी.टी. उषा आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृत बोली सादर केली.
या बोलीत अहमदाबादला आधुनिक, उच्च-मानक सुविधा असलेले कॉम्पॅक्ट क्रीडा शहर म्हणून सादर करण्यात आले आणि त्याचाच फायदा भारताला झाला.
भारतामध्ये प्रथमच एखादा मोठा मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट दिल्लीबाहेर होत आहे. याआधी 2010 चे कॉमनवेल्थ गेम्स, 1951 व 1982 चे एशियन गेम्स हे तीन मोठे क्रीडा महोत्सव प्रत्यक्षात दिल्लीमध्येच झाले होते.
कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करणाऱ्या देशांची यादी
आजवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, कॅनडा, न्यूझीलंडसह तब्बल 9 देशांनी कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवले आहे. सर्वाधिक 5 वेळा आयोजनाचा मान ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे.
2030 कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळाल्याने भारताची 2036 ऑलिम्पिक यजमानपदासाठीची दावेदारी अधिक बळकट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 2036 च्या ऑलिम्पिकसाठी भारताची इच्छापत्रिका जाहीर केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने औपचारिक बोलीही सादर केली. या निर्णयामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावरचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

