(नवी दिल्ली)
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मोठी कामगिरी बजावत ISI-पुरस्कृत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चार तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून १० अत्याधुनिक परदेशी पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुर्की आणि चीनमध्ये बनवलेली ही अत्याधुनिक शस्त्रे ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून भारतात, विशेषतः पंजाबमध्ये पाठवली जात होती. त्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील तस्कर ती दिल्ली-एनसीआर आणि इतर राज्यांतील गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचवत होते.
टोळ्यांना सप्लाय करणारे तस्कर जाळ्यात
अटक केलेल्या आरोपींची नावे मनदीप, अजय, दलविंदर आणि रोहन अशी असून ते पंजाब आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. हे सर्वजण लॉरेन्स बिष्णोई, गोगी, बंबीहा आणि हिमांशू भाऊ यांसारख्या कुख्यात टोळ्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या मॉड्यूलचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शस्त्रांचा दर्जा, वाहतूक पद्धती आणि सप्लाय नेटवर्क पाहता ही तस्करी साखळी अत्यंत सुव्यवस्थित आणि रमलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.
परदेशी सूत्रधारांचा शोध सुरू
विशिष्ट गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेने रोहिणी परिसरात सापळा रचून आरोपींना पकडले. सध्या तपास अधिकारी भारतात आतापर्यंत किती शस्त्रे या नेटवर्कमार्फत आली आणि कोणत्या गुन्हेगारी गटांना ती मिळाली याचा तपास करत आहेत. परदेशी सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशन्स, बँक व्यवहार, सोशल मीडिया आणि क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्सचे विश्लेषण सुरू आहे.

