(मुंबई)
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांतील आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले होते की, १९९३ साली कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळण्यात आले होते, याची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणी रामदास कदम यांची नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली होती.
या आरोपांवर आज (रविवार, ५ ऑक्टोबर) रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर येऊन परब यांचे सर्व आरोप “धादांत खोटे आणि बदनामीकारक” असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “काल त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्या काळी आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की आमच्याकडे गॅस सिलेंडर असावा. मी स्टोव्हवर स्वयंपाक करत होते, तेव्हा माझ्या साडीच्या पदराला आग लागली आणि ही दुर्दैवी घटना घडली. माझे पती मला वाचवण्यासाठी धावले आणि त्यांचेही हात भाजले. त्यांनीच मला रुग्णालयात दाखल केले आणि पुढे परदेशात उपचारासाठी नेले. त्यामुळे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे, याचा आम्हाला त्रास होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
रामदास कदम यांनीही या प्रकरणावर भाष्य केले होते. कदम म्हणाले होते की,अनिल परब यांच्याविरोधात माझी पत्नी कोर्टात जाणार आहे. बदनामी करण्याचे काम परबांनी केले आहे. त्यावेळी काय झाले हे अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा.
रामदास कदम यांनीही यापूर्वी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले, “खेडच्या आमच्या घरी तेव्हा दोन स्टोव्ह होते. स्वयंपाक करताना पत्नीच्या साडीला आग लागली. मीच तिला वाचवले आणि त्या प्रक्रियेत माझे हात भाजले. त्यानंतर जसलोक रुग्णालयात सहा महिने तिच्यावर उपचार झाले. त्या काळात खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.”
या प्रकरणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून राजकीय वातावरण तापले आहे.

