( राजापूर )
राजापूर तालुक्यातील ससाळे-जोगलेवाडी येथे अल्पशा आजाराने दर्शन सहदेव जागले (२८) यांचे रविवारी सकाळी दुःखद निधन झाले. केवळ सहा महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या दर्शनच्या अकस्मात जाण्याने जोगले कुटुंबियांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जोगले कुटुंब आर्थिकदृष्ट्या मर्यादित असून, दर्शनचे वडील सहदेव जोगले शेती आणि मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मोठा मुलगा म्हणून दर्शनवर घराची संपूर्ण जबाबदारी होती. शिक्षण पूर्ण करून इलेक्ट्रीशनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, मुंबईला न जाता तो गावातच राहिला आणि विद्युत वितरण कंपनीत ठेकेदार पद्धतीने लाईनमन म्हणून कार्य करू लागला. सध्या तो केळवली विभागात लाईनमन म्हणून कार्यरत होता.
दर्शनने दोन धाकट्या भावांचे शिक्षण स्वतःच्या कष्टावर पूर्ण केले. गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांतही तो नेहमी पुढाकार घेत असे. नुकत्याच पार पडलेल्या ससाळे ग्रामदेवता श्री गांगेश्वर देव यात्रोत्सवात त्याने ढोलवादन आणि पालखी नृत्यात उत्साहाने सहभाग घेतला होता. दोन दिवसांनंतरच तो आपल्यात नसणार, याची कुणालाच कल्पना नव्हती.
लाईनमन म्हणून काम करताना तो रात्री-दिवस बिघाडस्थळी धाव घेत विद्युत दुरुस्ती करत असे. कुटुंब सांभाळण्याच्या जबाबदाऱ्यासोबतच नव्या संसाराचे स्वप्न घेऊन या वर्षी मे महिन्यात त्याचा विवाह झाला. परंतु विवाहाला सात महिनेसुद्धा पूर्ण होण्याआधीच नियतीने क्रूर झडप घातली.
रविवारी छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडत असल्याने त्यानंतर राजापूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही वर्षांपूर्वीच त्यांच्या विवाहित बहिणीचे निधन झाले होते. आता दर्शनच्या अचानक जाण्याने जोगले कुटुंब कोलमडून पडले आहे. केळवली आणि ससाळे परिसरात या हरहुन्नरी तरुणाच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. दर्शन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

